ब्रम्हांडाचा काळा गडद रंग, कुठे लुप्त होणारा तारा तर कुठे तेजोमेघातून उदयास येणारा नवीन तारा. जन्म मृत्यूचा फेरा त्यालाही चुकला नाही तर आपलं काय?

Naynesh Gupte with Artwork by Akanksha

Image Source: Naynesh Gupte’s Facebook Post

या चित्रातील मागचे तेजोमेघ (Nebula) म्हणजे एका ताऱ्याचा जन्म आहे आणि त्या जन्माचे साक्षी आहेत जन्मापासूनच पछाडणारी मोरपीस रूपी माया आणि त्याचसोबत संपूर्ण ब्रम्हांडाला विष्णू तत्त्वाने व्यापणारा कृष्ण. अर्थात ! ती प्रकृती आणि तो पुरुष. तेच त्याचे जन्मदाते. जन्मतःच तेजाने भरलेला तो तारा, पण कर्मबद्ध होऊन आपल्या तेजाचे आपणच कारण आहोत, या भ्रमात तळपू लागतो. त्याच संपूर्ण आयुष्य तळपून दुसऱ्यांना प्रकाश देण्यात घालवणारा तो… पण कदाचित तोही अहंकाराने ग्रासतो. उजळून उजळून एका अशा क्षणाला पोहचतो जिथे सगळ्या अहंकाराचा नायनाट होतो. त्याची प्रकाशमय सकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि पुन्हा एकदा राहतो तो फक्त काळाकुट्ट अंधार! आता त्याला सगळे कृष्णविवर (Black Hole) म्हणून संबोधतात. मला वाटतं कृष्णाची माया त्याला समजत नसावी. आपलं तेज गेलं म्हणून आता त्याला प्रकाशाचा पण मत्सर वाटत असावा. कारण त्या रागात तो प्रकाशालासुद्धा ओढून घेतो. येईल का कधी तो या अज्ञानरूपी अंधारातून बाहेर ?

त्याचं माहित नाही पण आपलं आयुष्य त्याच्या आयुष्याहून फार वेगळं नाही. आपल्या कर्माच कर्तेपद आपण सोडू पाहत नाही की ते कर्म आपल्याकडून ज्या कारणास्तव घडवलं गेलं त्या कारणाच आदिकरण आपण शोधू पाहत नाही. आपल्या जीवनाचं मूळ उद्दिष्ट बाजूला ठेऊन आपण फक्त धावत राहतो. पण त्या कृष्णाकडे नाही तर मायेच्या कृष्णविवराकडे. त्या कृष्णाकडे जाण्याचा मार्ग तसा कठीण नाही पण आपल्याला भूरळ पाडते ती या चित्रातील मोरपिसाप्रमाणे मोहक आखीव रेखीव दिसणारी “माया” !

नयनेश गुप्ते

Artwork by – आकांक्षा

Scribbled Thoughts :
https://www.scribbledthoughts.nayaneshgupte.com/post/मायेचं-कृष्णविवर